येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाचा पाणीसाठा फार कमी राहीलेला असून शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १५ मिनीटे कपात केलेली आहे. पाऊस नसल्याने धरणात सुध्दा पाण्याचा साठा अल्प असल्याने येवले शहरावर पाण्याचे संकट लवकरच कोसळण्याच्या बेतात आहे. नागरिकांनी जपून पाणी वापरण्याचे आवाहन नगरपालिकेने केले आहे. आता धरणावर पाऊस झाल्याशिवाय या परिस्थितीत फरक पडणार नाही असे दिसून येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावात सोळा दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा शहराला तीस ते पस्तीस दिवस पुरणार आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यामुळे पालिकेने शिल्लक पाणीसाठा जास्त कालावधीपर्यंत पुरेल या बेताने नियोजन केले आहे त्याचप्रमाणे सात ते आठ दिवसांत पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यास शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागणार आहे. नागरिकांनी नगर परिषदेला सहकार्य करावे. ज्या नळकनेक्शन धारकांनी नळाला कॉक बसविलेले नसतील त्यांचे कनेक्शन बंद करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नळजोडणीचे पाणी बांधकामकरिता वापरताना आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई पालिका करणार आहे. सध्या पाऊस न झाल्यामुळे व साठवण तलावातील पाणीसाठ्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याने पाणीकपात करण्यात आल्याचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, पाणीपुरवठाप्रमुख भालचंद्र कुक्कर यांनी सांगितले.